बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रस्ता ओलांडण्यासाठी समांतर पादचारी पूल मंजूर व्हावा यासह इतर मागण्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केल्या आहेत.
नगरपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ एल रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने वाहने भरधाव वेगाने काँक्रिटच्या रस्त्यावरुन जात आहेत. याच महामार्गावर अंगणवाडी, प्रार्थमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय लागून आहे. तहसिल व पंचायत समिती कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेच्या प्रश्नी रस्ता ओलांडण्यासाठी समांतर पादचारी पूल मंजूर व्हावा अशी मागणी नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
बोदवड शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी महार्गावर दोन कलात्मक प्रवेशद्वाराची निर्मिती होण्याच्या महत्त्वपूर्ण बाबीची मागणी यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात आली. यासोबत कलात्मक स्ट्रीट लाईट्स, साईडपट्ट्यांवर पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ता दुभाजक या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक सईद बागवान, नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक सुनिल बोरसे, नगरसेवक गोलू बरडिया , नगरसेवक मयुर बडगुजर , नगरसेवक हर्षल बडगुजर आदींची उपस्थिती होती.