पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टोळी येथील माहेर असलेल्या २५ वर्षीय विवाहितेला ट्रॅक्टर घेण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील टोळी येथील बाहेर असलेल्या पुष्पा गणेश पगार (वय-२५) यांचा विवाह नाशिक जिल्ह्यातील आमोदे येथील गणेश आधार पगार यांच्यासोबत रितीरिवाजानुसार २०१७ मध्ये झाला. लग्नाच्यानंतर किरकोळ कारणावरून विवाहितेला टोमणे मारणे सुरु केले. त्यानंतर थेट पतीने ट्रॅक्टर घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून दीड लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. त्यानंतर पैसे दिले नाही म्हणून पती गणेश याने दारूच्या नशेत चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर “तू जर ट्रॅक्टरसाठी माहेरहून पैसे आले नाही तर तुला नांदविणार नाही”, असा दम देखील दिला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान विवाहितेच्या फिर्यादीवरून पती गणेश हजार पगार, सासरे आधार शंकर पगार, सासू रत्नाबाई आधार पगार, दिनेश आधार पगार सर्व रा. आमोदे ता.नांदगाव जि.नाशिक यांच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण पारधी करीत आहे.