जळगाव, प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांना शिक्षा होताच शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी आयुक्त उदय टेकाळे यांना पत्र लिहून मनपा सभागृहात असलेले सुरेश जैन यांचे तैलचित्र हटवण्याची मागणी केली आहे.
जळगाव महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सोबत सुरेश जैन यांचे तैलचित्र लावण्यात आलेली आहे. त्यांचे तैलचित्र लावण्यासाठी महापालिकेत कोणताही ठराव पारित करण्यात आलेला नाही असे गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे. देशाच्या परंपरेनुसार दर्शनीय भागात भिंतींवर महापुरुष तसेच देश हित जपणारे, सामाजिक हित जपणारे यांचे यांची तस्वीर लावण्यात येत असते. यातून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नागरिकांनी वागावे अशी अपेक्षा असते. यानुसार महापालिकेचे प्रमुख असल्याने गुप्ता यांनी आयुक्तांना जळगाव मनपा घरकुल घोटाळ्यात दोषी ठरलेले सुरेश जैन यांची तस्वीर मनपा सभागृहात लावून लोकांना त्यांनी केलेले घोटाळे करावेत अशी अपेक्षा आहे काय ? असा प्रश्न विचारला आहे. हे पत्र मिळाल्यानंतर एका तासाच्या आत घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांचे मनपा सभागृहातील तस्वीर हटविण्यात यावी अशी मागणी दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे. दरम्यान, गुप्ता यांनी कळविले आहे की, जैन यांचे तैलचित्र न काढल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ते आयुक्तांना गुलाब पुष्प भेट देणार आहेत.