दहिगाव ग्रामपंचायतीत दारूबंदीची पुन्हा मागणी; अवैध धंदे जैसे थे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीने तीन वेळा ग्रामसभा घेऊन गावात सर्रास विक्री होत असलेल्या देशी आणि गावठी दारूच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, अद्यापही दारू विक्री आणि अवैध धंदे सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईबाबत नाराजी आहे.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन दिवसांपूर्वी सरपंच अजय अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा ग्रामसभा घेण्यात आली होती. या सभेत दारूबंदी आणि अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, गावातील स्वच्छता, हागणदारीमुक्ती, अपंगांना निधी अनुदान, आणि रस्ते दिव्यांच्या व्यवस्थेबाबतही चर्चा झाली.

दहीगावात गावात दारू आणि पत्त्याचे अड्डे जोमाने सुरू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या अवैध धंद्यांमुळे काही ग्रामस्थांना मृत्युमुखी पडावे लागले आहे. यापूर्वी उपजिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी या धंद्यांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

स्वच्छता आणि हागणदारीमुक्ती अभियानासाठी बचत गटांना सूचना देव्यात यावा, अपंगांसाठी वसुलीच्या निधीतून पाच टक्के अनुदानाचा ठराव करून गावातील रस्ते दिव्यांच्या व्यवस्थेबाबत उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आले होते. सभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे, आणि पाच सदस्य उपस्थित होते. उर्वरित सदस्य अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ग्रामसभा ही सर्व सदस्यांनी हजर राहून गावाच्या समस्या समजून घेण्यासाठी महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Protected Content