भडगाव प्रतिनिधी । भडगाव नगरपरीषद हद्दीतील थकीत मालमत्ता करावर १२% प्रमाणे व्याज आकारणी करून सर्व सामान्य जनतेकडून नगरपरीषद वसुल करीत आहे. नगरपरीषद स्थापने पासून आजपावेतो थकीत मालमत्ता करावर अन्यायकारक व बेकायदेशीरपणे आकारण्यात येत असलेल्या व्याजाच्या पध्दतीत सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन चोरडीया यांनी लेखी निवेदना द्वारे केली आहे.
नगरपरीषदेत स्थापित कायद्यानुसार व त्यातील तरतुदीनुसार थकीत मालमत्ता करावर अशा अन्यायकारक पध्दतीने कर आकारण्याची कोणतीही कायदेशीर तरतुद नाही. आर्थिक वर्ष हे १ एप्रिल पासून सुरू होवुन ३१ मार्च रोजी समाप्त होते. असे असतांना आर्थिक वर्ष हे ३१ मार्च रोजी समाप्त झाल्यानंतर त्वरीत जर कोणताही सर्व सामान्य व्यक्ती अथवा मालमत्ताधारक थकीत मालमत्ता कर भरण्यास नगरपरीषदेत गेल्यास त्याचेकडून थकीत मालमत्ता करावर पुढील संपूर्ण आर्थिक वर्षाचे १२% प्रमाणे व्याज आकारले जाते. तसेच कराची मुळ रक्कम व त्यावरील व्याज जर थकीत झाले तर त्या संपूर्ण व्याजासहीत रक्कमेवर पुन्हा चक्रवाढ पध्दतीने व्याजावर व्याज आकारले जात आहे.
भडगांव नगरपरीषद मालमत्ता धारकांकडून ज्या पध्दतीने थकीत मालमत्ता करावर व्याज आकारणी करीत आहे. त्यास स्वातंत्र्यपूर्व काळातील झिया कर, रजाकार कर अशा विविध अन्यायकारक कराची उपमा देणे चुकीचे होणार नाही. त्याच पध्दतीने आपल्या नगरपरीषदेची वाटचाल सुरू आहे. याउलट राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या उत्पदनात वाढ व्हावी म्हणून आगाऊ कर भरणा-या मालमत्ता धारकास आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या विविध आकर्षक योजना जाहीर करून मालमत्ता कर आगाऊ भरण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात. याउलट भडगाव नगरपरीषद कार्य करीत आहे. त्यामुळे नगरपरीषदेच्या मालमत्ता कर वसुलीवर विपरीत परीणाम होऊन त्याचा काही अंशी विपरीत परीणाम हा गांवाच्या विकासावर व प्राथमिक सुखसुविधांवर होत आहे. अन्यायकारक व बेकायदेशीर पध्दतीने व्याज आकारणी होत असल्यामुळे नगरपरीषद थकीत मालमत्ता कराची रक्कम ही दिवसेंदिवस वाढत आहे.
कारण आपल्या नगरपरीषदेच्या मनमानी व अन्यायकारक थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या जाचक पध्दतीमुळे थकीत मालमत्ता कर जरी एप्रिल महिन्यात कोणत्याही सर्व सामान्य व्यक्तीने किंवा मालमत्ता धारकाने भरला तरी त्या थकीत मालमत्ता करावर पुढील मार्च महिन्या पर्यंतचे व्याज आकारले जात आहे. मालमला कर भरणारा व्यक्तीने व्यवहारीक दृष्टीने विचार केल्यास पुर्ण वर्षाचे व्याज भरायचेच आहे. तर आपण ही रक्कम पूर्ण मार्च पर्यंत व्यवहारात वापरून व खिशात रक्कम उपलब्ध असतांना देखील मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करतो व अशा पध्दतीने मालमत्ता कराची थकीत रक्कम वाढत जात आहे. तरी अशा अन्यायकारक व बेकायदेशीर पध्दतीने आकारले जाणाऱ्या व्याजाच्या पध्दतीत सुधारणा होऊन ती थकीत मालमत्ता कराच्या प्रत्येक महिन्याप्रमाणे आकारली जावी.
तसेच थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या व्याजावर पुन्हा चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारू नये. या सर्व अन्यायकारक व बेकायदेशीर कामाच्या पद्धतीत त्वरीत सुधारणा करून यापूर्वी अशा पध्दतीने सर्व सामान्य जनतेकडून व मालमत्ता धारकांकडून वसुल केलेली रक्कम त्वरीत त्या मालमत्ता धारकांना परत देण्यात यावी. सदर कारवाई आपणास पत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत करावी व त्याबाबत मला लेखी पत्र देऊन अवगत करावे. आपण तसे न केल्यास मला आपणा विरुद्ध व आपल्या कार्यालयाकडून सुरू असलेल्या अन्याया विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असे निवेदन माजी नगरसेवक सचिन चोरडीया यांनी न.पा. प्रशासक डाॕ. बादल व मुख्यधिकारी रविद्र लांडे याना दिले आहे.