चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील घोडेगावासह शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्या वास्तव्य करीत असून परिसरात नागरिक भयभीत झाले आहे. यामुळे पिंजरा लावून पकडण्याची मागणी शेतकऱ्यांसह रयत सेनेने वनविभागाकडे केली आहे.
तालुक्यातील घोडेगाव गावात गेल्या १५ दिवसांपासून जंगलातुन बिपट्या शिंदी फाटा ते नाथ मंदिर या परीसरातील शेतात वास्तव करून वस्तीपरीसरात दिसु लागल्याने शेतकरी व शेत मजुर प्रचंड भयभीत झाले आहे. कालपर्यंत २ गायी, १ गोरा व काही कुत्रे बिपट्याने फस्त केले आहे. यामुळे शेतकरी व शेत मजुरांचे शेती कामे खोळंबली आहे. तसेच बिबट्यामुळे मनुष्यहानी होवु नये म्हणून चाळीसगाव प्रादेशीक वन विभागाने बिबट्याला पिंजरा लावून पकडण्याची मागणी शेतकरी व रयत सेनेच्या वतीने दि १५ रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान घोडेगाव हे गाव डोगराच्या जवळ वास्तव्याला असल्यामुळे या परिसरातून वन्यजीव भरवस्तीत येतात. गेल्या १५ दिवसांपासून बिबट्या शेतात वास्तव करून राहणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना दिसत असल्यामुळे परीसरातील लोक भयभीत झाले आहेत. शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत जाणे मुश्किल झाले तर शेती कामे करता येत नाहीत. तर शेतमजुर शेतीकामे करण्यास घाबरत असल्यामुळे लवकरात लवकर शिंदी फाटा ते नाथ मंदिर या परीसरातील वावर असणाऱ्या बिपट्याला चाळीसगाव प्रादेशीक वन विभागाने पिंजरा लावून पकडण्याची मागणी करत बिबट्या मुळे परीसरात मनुष्यहानी झाल्यास त्यास प्रादेशीक वन विभाग जबाबदार राहणार असल्याचे इशारा शेतकरी व रयत सेनेच्या वतीने वनपरीक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष किरण पवार, दिनेश पवार, दत्तू पवार, मच्छिंद्र पवार, यशवंत जाधव ,अमोल माने, रवींद्र गायकवाड, अक्षय पवार, दिपक पवार, बाळु शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.