जामनेर प्रतिनिधी । अस्मानी संकटामुळे तालुक्यासह राज्यातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी जामनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शासनाला निवेदन देवुन करण्यात आली आहे.
राज्यात वादळ आणि अतिवृष्टी होवुन पुर परिस्थिती निर्माण होवुन गावचे-गाव जलमय झाले होते. अजुनही तशी परिस्थिती असुन त्याचा फटका शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस, मका, सोयाबीन, केळी, ज्वारी इत्यादी पिके पुर्णपणे नष्ट झाली असुन काही शेतकऱ्यांच्या जमीनी, गुरेढोरे वाहुन गेली.
यावेळी तहसीलदार अरूण शेवाळे यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपुत यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व तांत्रिक अडचणी मांडल्या.सामाजिक न्यायचे तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे,राजेश नाईक,माधव चव्हाण, डॉ.प्रशांत पाटील,किशोर खोडपे,नटवर चव्हाण, जितेश पाटील, इम्रान शेख, सागर कुमावत,नाना पाटील, नरेंद्र जंजाळ, विशाल पाटील,आदींसह तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.