जळगाव, प्रतिनिधी | जळगाव महापालिकेचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी घरकुल घोटाळ्यातील नगरसेवकांना अपात्र करण्याची कोणतीही ठोस कारवाई न केल्याने त्यांच्यावर दप्तर दिरंगाई व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर यांच्याकडे ई- मेलद्वारे केली आहे.
दीपककुमार गुप्ता यांनी नगरविकास प्रधान सचिवांना या मेलमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जळगावातील घरकुल घोटाळ्यात धुळे न्यायालयाने ३० ऑगस्ट २०१९ रोजी विद्यमान पाच नगरसेवकांना दोषी ठरवले आहे. यात भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रेय कोळी, लता भोईटे, कैलास सोनवणे यांचा समवेश आहे. महापालिका अधिनियम कलम १२ नुसार मनपा आयुक्तांनी न्यायालयाच्या दिशादर्शक तत्त्वानुसार ९० दिवसांच्या आत संबंधित दोषी नगरसेवकांना अपात्र करण्याची कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, मनपा आयुक्तांनी केवळ कागदी घोडे नाचवून संबंधित नगरसेवकांना १४ दिवसांची नोटीस दिली आहे. यातून आयुक्त टेकाळे यांचा या नगरसेवकांसोबत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा संशय आहे, असा आरोपही गुप्ता यांनी केला आहे. आयुक्तांकडे या दोषी नगरसेवकांवर कारवाईची मागणी करूनही त्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने त्यांच्यावर दप्तर दिरंगाई व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुप्ता केली आहे.