Home Cities जळगाव गो -रक्षक मोनू मानेसरला जामीन देण्याची मागणी ; जळगावातील राष्ट्रीय हिंदू संघटनेचे...

गो -रक्षक मोनू मानेसरला जामीन देण्याची मागणी ; जळगावातील राष्ट्रीय हिंदू संघटनेचे राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्र्यांना निवेदन

0
125


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या जळगाव जिल्हा इकाईने गो -रक्षक मोनू मानेसर (मोहित यादव) यांना न्यायाच्या दृष्टीने जामीन मंजूर व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच राज्य सरकारकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामचंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नासिर-जुनैद हत्या प्रकरणात मोनू मानेसर सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावतीने अनेकदा जामीन अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर)च्या आधारे, सम्यक व सविस्तर सुनावणी न करता हे जामीन अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तथाकथित हत्या प्रकरणात मोनू मानेसर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते, याचा ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या मते, सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांत “जामीन हा प्रत्येक आरोपीचा मूलभूत अधिकार आहे” असे स्पष्ट केलेले असताना, या प्रकरणात त्या तत्त्वाचा योग्य विचार होत नसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे न्यायाच्या बाजूने या प्रकरणाची दखल घेऊन मोनू मानेसर यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन दिनांक २५ डिसेंबर २००४ च्या संदर्भाने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे सादर करण्यात आले असून त्यावर जिल्हा पदाधिकारी व संघटनेतील विविध सदस्यांच्या सह्या आहेत. नागराज महाजन, ओमप्रकाश जोशी, कोळी,  सौ. विजया गाजरे, राजेंद्र बंसल, राजेंद्र बारी, सौ. मंगला बारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नावे निवेदनात नमूद आहेत.


Protected Content

Play sound