यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपत असताना शासनाकडून प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशी ठाम आणि एकमुखी मागणी यावल तालुका सरपंच परिषद (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीमुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
यावल तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद (मुंबई) शाखा यावल यांच्या वतीने तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच परिषदेचे यावल तालुका अध्यक्ष संदिप प्रभाकर सोनवणे यांनी भूषविले.

बैठकीदरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त करण्याऐवजी विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी द्यावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी १९९३ साली शासनाने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केल्याचा दाखला देण्यात आला. त्याच धर्तीवर सध्याही निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका सरपंच परिषदेकडून मांडण्यात आली.
या मागणीसंदर्भात सरपंच परिषदेकडून प्रोसीडिंग बुकांची नक्कल तसेच १९९३ साली करण्यात आलेल्या प्रशासक नियुक्तीच्या आदेशाची प्रत यावल पंचायत समिती व जळगाव जिल्हा परिषद यांना सादर करण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय घेऊन तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, असे निवेदन तालुका अध्यक्ष संदिप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी साकळी येथील सरपंच दिपक पाटील, भालोद येथील प्रदीप कोळी, ज्योती कोळी, अजय भालेराव, नौशाद तडवी, अशोक तायडे, रोहीदास कोळी यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक पातळीवरील अनुभव असलेल्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी दिल्यास विकासकामे आणि प्रशासनात सातत्य राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



