बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याची चर्चा सुरू असताना श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर जालना जिल्ह्यातील वारकऱ्यांनी पायदळ वारीची परंपरा अखंड ठेवली आहे. जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथील जवळपास १५०० वारकरी चार दिवसांत सुमारे १०५ किलोमीटरचा पायदळ प्रवास करत शेगाव येथे दाखल झाले. गॅस तुटवड्याच्या परिस्थितीतही वारी न खंडता पार पाडल्याने या वारकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथून निघालेल्या या पायदळ पालखीत सुमारे ९०० पुरुष आणि ६०० महिला वारकरी सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने ही दिंडी शेगावकडे रवाना झाली होती. चार दिवसांचा सुमारे १०५ किलोमीटरचा प्रवास करत अखेर सर्व वारकरी शेगाव येथे पोहोचले.

विशेष म्हणजे राज्यात सध्या घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत असतानाही या वारकऱ्यांनी आपल्या वारीत कोणताही अडथळा येऊ दिला नाही. प्रवासादरम्यान जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत लाकडाच्या जळणाचा वापर केला. त्यामुळे गॅस तुटवड्याची चिंता न करता वारीची परंपरा कायम राखण्यात त्यांना यश आले.
या पायदळ दिंडीचे हे सलग आठवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने ही वारी पार पडली. मार्गात वारकऱ्यांनी भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत प्रवास केला. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
दिंडीचे अध्यक्ष यांनी सांगितले की, सध्या गॅसचा तुटवडा असला तरी वारकऱ्यांच्या भक्तीपुढे कोणतीही अडचण मोठी नसते. त्यामुळे लाकडाच्या जळणाचा वापर करून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि सर्व वारकरी सुरक्षितपणे शेगाव येथे पोहोचले.



