Home क्राईम इंस्टाग्रामवर खोटे खाते तयार करून महिलांची बदनामी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

इंस्टाग्रामवर खोटे खाते तयार करून महिलांची बदनामी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

0
155

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून महिलांचे छायाचित्रे वापरत त्यांच्याशी संबंधित अश्लील व बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संबंधित महिलांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गंभीरतेने दखल घेतली आहे.

फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्यासह इतर महिलांचे वैयक्तिक फोटो खाजगीपणे वापरून, त्याचबरोबर चिनावल गावातील काही पुरुषांचे फोटो त्यास जोडून, “LOVE YOU”, “WITH LOVE”, “WHO IS THE BEST RANDI”, “RANDACHA PORYA”, “WHO IS HOT” अशा अश्लील व मानहानीकारक कमेंट्स सोशल मीडियावर करण्यात आल्या. हे सर्व फोटो व मजकूर बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता, ज्यामुळे महिलांचा सार्वजनिक अपमान व विनयभंग झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सदर प्रकरणी सावदा पोलिसांनी CCTNS गु. र. नं. 227/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75(3), 296 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 67 व 67(अ) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ (मुक्ताईनगर पोलीस स्टेशन) यांच्याकडे सोपविण्यात आला असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तांत्रिक माहिती घेण्यासाठी सायबर विभागाची मदत घेतली जात आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित खोटे इंस्टाग्राम खाते बंद करण्यात आले असून, यामागील आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांकडून IP अ‍ॅड्रेस, लॉग-इन माहिती व अन्य तांत्रिक तपशील गोळा करण्यात येत आहेत. लवकरच आरोपीला शोधून कडक कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

सावदा व परिसरातील नागरिकांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोशल मीडियावरील गैरवापर थांबवण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या प्रकारातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केल्यामुळे नागरिकांत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound