
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित, स्वायत्त व नॅक मानांकित गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘डिपेक्स टॉक 2K26’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’च्या सहकार्याने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि करिअरच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एबीव्हीपी देवगिरी प्रांत प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, राम अँटीव्हायरस प्रा. लि.चे डायरेक्टर कल्याण दाणी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डीन इनोव्हेशन प्रा. डॉ. हेमंत इंगळे, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, डीन अकॅडेमिक प्रा. नितीन पाटील यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा व्यासपीठांचा उपयोग करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कल्याण दाणी यांनी सायबर सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील संधींबाबत सविस्तर माहिती दिली. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व वाढत असून, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात कौशल्य विकसित केल्यास भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो. शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभवही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थी परिषद प्रतिनिधी प्रणव कंवर, यश बोंडे, मोहित चौधरी व रोहित कोळी यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा सोनवणे यांनी केले.
या उपक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.



