Home Cities जळगाव शेतकऱ्यांसोबत शासकीय आदेशाची होळी करत दिपाली सोनवणे यांचा अनोखा विरोध 

शेतकऱ्यांसोबत शासकीय आदेशाची होळी करत दिपाली सोनवणे यांचा अनोखा विरोध 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  दिवाळीचा सण उजाळा, आनंद आणि आशेचा असतो. पण ज्या मातीत राबणाऱ्यांच्या घामावर देशाचा पोशिंदा उभा आहे, त्या शेतकऱ्यांनाच जर अंधारात ठेवलं जात असेल, तर त्यांच्यासाठी दिवाळी ही केवळ एक वेदना ठरते. हेच वास्तव जळगाव जिल्ह्यातील कानळदा, नांद्रा बु., भोकर, नंदगाव, पिलखेडा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी अनुभवले. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे मोठमोठे आश्वासने दिली होती. मात्र, ही आश्वासने फोल ठरल्याने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागली.

या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जळगाव ग्रामीणचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि सौ. दिपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी या शेतकरी बांधवांसोबत काळी दिवाळी साजरी करत शासनाच्या धोरणांचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांना धीर देण्याच्या हेतूने त्यांनी या भागातील शेतकऱ्यांसोबत एकत्र येत ‘जी.आर.’ अर्थात शासकीय आदेशाची होळी करत शासनाच्या ‘केवळ घोषणा आणि शून्य कृती’ धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी अनेकदा आंदोलन, निवेदनं, बैठका घेण्यात आल्या. तरीही आजही त्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. त्यामुळे या पंचक्रोशीतील शेतकरी अक्षरशः संकटात सापडले आहेत. त्यांच्या पिकांचे नुकसान, बाजारभावातील चढ-उतार आणि आता या आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या सणाला देखील अंधाराची किनार लाभली आहे.

सौ. दिपाली सोनवणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही केवळ टीका करण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या वेदनांमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आलो आहोत. ज्यांनी आश्वासने दिली, त्यांनी ती पाळली नाहीत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद न साजरा करता, त्यांच्या वेदनांमध्ये सहभागी होतो आहोत.”

या काळ्या दिवाळीत शेतकऱ्यांच्या मनातील वेदना, शासनाच्या असंवेदनशीलतेविरुद्धचा राग आणि भविष्यातील अनिश्चिततेची छाया स्पष्ट दिसून आली.


Protected Content

Play sound