यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये दीप अमावस्या हा सण अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशाने शाळेचा संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे या सणाला एक वेगळीच रंगत आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना महाजन उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते श्रीगणेश पूजन आणि दीपपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ. दीपाली धांडे यांनीही उपस्थिती दर्शवली. यावेळी दिव्यांपासून तयार करण्यात आलेले “श्री” हे पवित्र चिन्ह सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रज्वलित केले आणि नयनरम्य प्रकाश शाळेच्या संपूर्ण परिसरात पसरला.

दीप अमावस्येच्या धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ. वैशाली अडकमोल आणि सौ. माधुरी पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये या सणाविषयी कुतूहल जागवले आणि आपल्या संस्कृतीतील मूल्यांची ओळख करून दिली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. रंजना महाजन यांनीही दीप अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आपले विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुंदर आणि शिस्तबद्ध सूत्रसंचालन सौ. मनीषा पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. सुजाता पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. राजश्री लोखंडे व सौ. गौरी भिरुड यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले. दीप अमावस्येचा सण विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सण न राहता, श्रद्धा, एकजूट आणि आनंदाचा अनुभव देणारा सोहळा ठरला.



