सामान्य रुग्णालयातील ‘आय सी यु बेड’चे मनोज शाह यांच्या हस्ते लोकार्पण

खामगाव प्रतिनिधी | ‘मिशन आयसीयू’अंतर्गत येथील शासकीय रुग्णालयाला दहा आय सी यू बेड, दोन व्हेंटिलेटर, सिरिंज पम्प, इन्फ्युजन पंप, मॉनिटर्स व इतर साहित्य रोटरी क्लब खामगाव यांच्या प्रयत्नातून देण्यात आले आहे.

याचा लोकार्पण सोहळा दि. २८ जानेवारी २०२२ रोजी मिशन ‘आय सी यु’ सह संस्थापक मनोज शाह व त्यांच्या पत्नी अल्पा शाह यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी मिशन ‘आय सी यु’चे दर्शन महाजन, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश टापरे, रोटरी क्लबचे २०२२/२३ चे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ.आनंद झुंनझुनवाला व रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन शाह यांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना मनोज शाह म्हणाले की, “मिशन आयसीयूने केलेल्या सर्वेक्षणात येथील सामान्य रुग्णालयात बेड व क्यूबऑक्युपन्सी दर सामान्य काळातही शंभर टक्के आहे .त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी दर्जेदार सुविधांची गरज आहे हे ओळखून मिशन आयसीयू तर्फे दहा बेडसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांवर योग्य ते उपचार होतील. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी सुमारे १.६ कोटी इतका निधी ‘क्रिप्टो रिलीफ’तर्फे मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ.निलेश टापरे, डॉ.आनंद झुनझुनवाला व नितीन शाह यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नितीन शहा यांनी तर आभार प्रदर्शन समीर संचेती यांनी केले. या कार्यक्रमास प्रकल्प संचालक सुजित भडंग, प्रमोद अग्रवाल, देवेश भगत, निर्मला जैन, कुसुम शेलारका, कल्पना धाबलिया यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘मिशन आयसीयु’ हा एक सहयोगी उपक्रम आहे, जो ‘सीएचडी’द्वारे चालविला जात आहे. डॉ.अश्विन नाईक, मनोज शाह व डॉ.एडमंड फर्नांडीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या उपक्रमाचा आरोग्य सेवा व पायाभूत सुविधा वाढविण्याचा उद्देश्य आहे..

 

Protected Content