Home Cities जळगाव जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप किसान मोर्चाची मागणी

जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप किसान मोर्चाची मागणी

0
292

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात झालेल्या वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, मका, केळी, सोयाबीन, ऊस, फळबागा आणि कडधान्ये अशा खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना बुधवारी (२४ सप्टेंबर) निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात किसान मोर्चाने प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या समस्या मांडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर वाहून जाऊन मृत्यूमुखी पडल्याचे गंभीर वास्तव निदर्शनास आणून दिले.

प्रमुख मागण्या:
नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. जळगाव जिल्ह्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. बेघर झालेल्या कुटुंबीयांना अत्यावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा. केळी पिकाला हमीभाव जाहीर करून तो लागू करावा.

यावेळी, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, प्रदेश सरचिटणीस सुरेश धनके, राजेंद्र सोनवणे, विजय महाजन, देवेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound