
रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी, केळीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रावेर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात निवेदन देऊन केली. शासनाने १० दिवसांत यावर कार्यवाही न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतीच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर, सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तहसील कार्यालयाकडे मोर्चा काढला. यावेळी, ‘ओला दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा’, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे’, ‘केळीवरील करपा रोगासाठी अनुदानावर औषधे द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना दिलेल्या निवेदनात महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओला दुष्काळ जाहीर करणे, केळी पीकविम्याचे मंडळ व निकष जाहीर करणे, अतिपावसामुळे केळीवर वाढलेल्या करपा रोगासाठी शासकीय अनुदानावर औषधे उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि कर्जमाफी देणे या मागण्यांचा समावेश आहे.
या वेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, शिवसेना उपनेते प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे सोपान पाटील, प्रल्हाद बोंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुकाध्यक्ष नितीन महाजन, अशोक शिंदे, सुनील कोंडे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन स्वीकारताना प्रशासनाने या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असले, तरी १० दिवसांच्या आत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास महाविकास आघाडी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन करेल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



