मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संविधान तसेच कायद्यातील तरतुदींच्या आधारे सर्वांना न्याय मिळेल असा निकाल दिला जाईल असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज सकाळी केले आहे.
आज राज्यातील सत्ता संघर्षावर विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर हे सायंकाळी निर्णय जाहीर करणार आहेत. याआधी राजकीय वातावरण तापले आहे. आज सकाळीच खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. अपात्रतेच्या निकालाचे आधीच मॅच फिक्सींग झाले असून आता फक्त औपचारिकताच बाकी असल्याचे राऊत म्हणाले. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी राहूल नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
याप्रसंगी राहूल नार्वेकर म्हणाले की, संविधानातील दहाव्या सूचीनुसार निकाल देण्यात येणार आहे. हा निकाल तटस्थ आणि सर्वांना न्याय देणारार असेल असेही राहूल नार्वेकर यांनी नमूद केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांची भेट घेण्यात काहीही गैर नसल्याचेही त्यांनी म्हटले. तर, संजय राऊत यांच्यावर आपण बोलणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.