मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत आजच्या सर्वपक्षीय बैठकीत दिसून आले असून दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यामुळे आता आठ वा चौदा दिवसांचा लॉकडाऊन अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील मंत्री सहभागी झाले होते. यात फडणवीस यांनी पूर्णपणे लॉकडाऊन लावण्यास विरोध केला. ते म्हणाले की, कोरोनामुळे जनता आधीच जेरीस आलेली आहे. यामुळे आता कडक लॉकडाऊन लागला तर सर्वसामान्यांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागेल. सरकारने आपला प्लॅन मांडावा, अन्यथा लोकांचा उद्रेक होईल असे ते म्हणाले. तर चंद्रकांत पाटील यांनीही पूर्ण लॉकडाऊनला विरोध केला. ते म्हणाले की, पहिल्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने जनतेला मोफत धान्य दिले होते. आता लॉकडाऊन लावणार असाल तर राज्य सरकारने या प्रकारचे काही नियोजन केले आहे का ? अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी केली. तर दरेकर यांनीही राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या मनसुब्यांना विरोध केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मात्र आपली मागणी ठामपणे मांडली. ते म्हणाले की, सध्या सुरू असणारा संसर्ग पाहता किमान आठ दिवसांचा लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे. यानंतर क्रमाक्रमाने परिस्थितीची पाहणी करून पुढील निर्णय घ्यावा लागेल. थोडी सवलत आणि थोडी कडक कारवाई असे चालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर कडक लॉकडाऊनचा निर्णय अटळ असून याबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली. यात आठ वा १४ दिवसांचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सुमारे सव्वा दोन तासापर्यंत बैठक चालल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मिटींगमधील त्रोटक माहिती दिली. नाईलाजास्तव काही निर्णय घ्यावे लागतात असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. उद्या टास्क फोर्सची बैठक होणार असून यात लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला जाईल असे मानले जात आहे.