मुंबई (प्रतिनिधी) ‘स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते धक्कादायक आणि गंभीर आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे?, हे संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, 30हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर या दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींना भेट दिली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसदेखील केली. दुर्घटनेत 10 लोक जखमी असून, एक आयसीयूमध्ये आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा, असे तातडीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आधीच दिले आहेत.