यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाळे शिवारात विहीर खोदकाम करणार्या मजुराच्या अंगावर मोठा दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना आज पहाटे घडली.
याबाबत वृत्त असे की, येथील धनगरवाडा मोठा मारुती परिसरातील राहणारा गिरीश वासुदेव चौधरी वय २० या अविवाहित तरुणाचे आज सकाळी पाच५ते ६ वाजेच्या दरम्यान परसाळे शिवारातील विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गिरीश चौधरी याचा मृतदेह यावल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. चौधरी हा विहीरीचे खोदकाम करणारा मजुर होता. आज दिनांक २२ जुलै रोजी पाच वाजेच्या सुमारास तो अन्य सहमजुरांसोबत कामाला गेला होता. गिरीश चौधरी विहिरीत उतरला असता त्याच्या अंगावर जड दगड पडल्याने तो जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संबंधीत विहीर ही विद्या रघुनाथ तळेले परसाळे ता. यावल यांच्या मालकीची असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.