जळगाव (प्रतिनिधी) शहरातील औद्योगिक वसाहतीत पटेल कंपनीत काम करत असताना शेडच्या खांबात विद्युत करंट उतरल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२९) दुपारी घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र बाळू सपकाळे (वय ३०) रा.कठोरा, ता.जि. जळगाव हा गेल्या १५ वर्षांपासून पटेल पॅकेजिंग या कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता. आपल्या भावांसोबत त्याच कंपनीत असलेल्या रूममध्ये राहत होता. आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीच्या कामानिमित्त पत्र्याच्या शेडवर चढत असताना पत्रात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने तो खाली पडला. त्याला भावाने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मालकाच्या दुर्लक्षामुळे या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने हा प्रकार घडला असल्याचे त्याचे भाऊ व कामगार चंद्रकांत बाळू सपकाळे, दिगंबर तुळशीराम, मनोज शिवराम कोळी यांनी सांगितले. रवींद्र सपकाळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही कुटुंबियांकडून केली जात आहे.जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत रवींद्र सपकाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.