यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेतातील विहीरीचे बांधकाम करण्यास गेलेल्या मजूराचा विहीरीत पडल्याने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या बाबत ची माहीती अशी की यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शिवारातील गुणवंत चिंतामण चौधरी यांच्या गेल्या अनेक दिवसापासुन सोडुन दिलेल्या जुनाट विहिरीचे काम पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता कोळवद येथील पांडुरंग मिस्त्री यांना विहीरीचे बांधकाम देण्यात आले होते. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास विहीरीचे काम करीत असतांना पांडुरंग मिस्त्री यांच्या सोबत मजुरीला असलेला सुधीर शिवराम चौधरी (वय५१ वर्ष रा. कोळवद ता. यावल) हा १५० फुट खोल असलेल्या कोरडया विहीरीत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. मिस्त्री यांनी डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नितिन भागवत भिरूड यांना याबाबतची माहीती दिल्यावर त्यांनी डोंगर कठोरा येथील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांना कळविण्यात आले.
दरम्यान, सुधीर चौधरी यांचा मृतदेह विहीरीतुन काढण्यास अनेक अडचणी आल्या. शेवटी दुपारनंतर भुसावळ हुन क्रेन मागवुन संध्याकाळी पाच वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आले. मयत सुधीर शिवराम चौधरी यांचे प्रेत यावल च्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी आणण्यात आले आहे. मृत्यु पावलेला व्यक्ति हा अंत्यंत गरीब कुटुंबातील असुन त्याच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावल पोलीसात दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.