जळगाव (प्रतिनिधी) । रावेर तालुक्यातील खिरोदा येथे माजी आ.शिरीष चौधरी यांच्या मुलीचे लग्न आटोपून भुसावळकडून मुंबईकडे स्विफ्ट कारने निघालेल्या त्यांच्या जेष्ठ भगिनी स्नेहजा रुपवते (वय ६५) यांचा गाडीचे टायर फुटल्याने महामार्गावर झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही उलटलेली कार समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीला जोरदार धडकल्याने अन्य सात जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पाळधी येथील साईबाबा मंदिराजवळ ३.३० च्या सुमारास घडली. या अपघातातील जखमी वासुदेव माळी याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्याचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलगी यज्ञा चौधरीचे लग्न तालुक्यातील खिरोदा येथे शनिवारी पार पडले. या लग्नात आमदार शिरीष चौधरी यांच्या मोठ्या बहिण स्नेहजा रुपवते (वय -65) ह्या आज दुपारी भुसावळहून मुंबईकडे जाण्यासाठी स्विप्ट कारने जात असतांना पाळधीजवळी साईबाबा मंदीराजवळ दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास कारचे मागचे टायर फुटून दुचाकीवर आदळली. या आपघातात स्नेहजा रुपवते (वय -65) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कारमध्ये बसलेल्या मुलगी बंधमुक्ता खान (वय-34), उत्कर्षा प्रशांत रूपवते (वय-36) या दोन मुली, सोबत जावई प्रशांत, नातू साहस सॅलियत खान (वय-3), नात उन्मीत खान (वय-13) आणि चालक अशपाक पिंजारी हे जखमी झाले. यातील चाकल हा गंभीर जखमी झाला आहे.
स्नेहजा रुपवते या माजी आ. शिरीष चौधरी यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या. माजी विधानसभाध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या कन्या तर माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या स्नुषा होत्या. महर्षी दयानंद महाविद्यालय वडाळा मुंबई येथे त्या अध्यापनाचे कार्य करीत होत्या. त्या मुंबई आणी नगर परिसरातील अनेक शैक्षणिक आणी सामजिक संस्थात कार्यरत होत्या. कुसुमताई चौधरी महिला कल्याणी संस्था तसेच मुंबईतील मलबार हिल येथील बालकल्याणी संस्थेच्या अध्यक्षा होत्या. जळगावात २००५ मध्ये संपन्न झालेल्या राज्यव्यापी महिला कवयित्री संमेलन ‘कुसुमांजली’च्या त्या मुख्य आयोजक होत्या. नंतर असे संमेलन त्यांनी नगर, कोल्हापूर आणी औरंगाबाद येथेही आयोजित केले होते.
माणुसकीचे दर्शन
ज्या वेळी अपघात झाला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटील व लीलाधर सदाशिव तायडे हे कामतवाडी येथून लग्न आटोपून परतत असताना अपघात झाल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने स्वतःच्या कारमध्ये जखमींना टाकून खासगी रुग्णालयात दाखल केले.
दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
तर समोरून येणाऱ्या दुचाकीतील वासुदेव दशरथ माळी (वय-२९) व चेतन लक्ष्मण पाटील (वय-२३) दोघे राहणार आसोदा, तालुका जळगाव, हे धरणगाव तालुक्यातील कानळदा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले असता लग्न आटोपून परतत असताना ही कार उलटून त्यांच्या दुचाकीवर आदळली. यात ते दोघेही जखमी झाले आहेत. दुचाकी वरील जखमींना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास यातील वासुदेव माळी याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जखमी तरूणाचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप
पाळधीजवळ महामार्गावर स्वीप्ट कारचे टायर फुटल्याने कारची समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळल्याने दुचाकीतील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आर्धातास जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान आसोदा ग्रामस्थांनी जखमींवर जिल्हा रुग्णालयात नीट उपचार झाले नाही, असा आरोप करून रागाच्या भरात गदारोळ केल्याची घटना घडली आहे. यावेळी काही तरुणांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दमदाटीही केली. त्यांनी रुग्णाला अतिदक्षता विभागात आणि ऑक्सीजन मास्क न लावल्याचा त्यांना राग आल्याचे कळले आहे.