विजेचा धक्का लागल्याने महिला सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का बसल्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी भागात घडली.चंद्रकला नरसिंग मिरदुडे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत चंद्रकला यांचा मुलगा संदीप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकला बालेवाडीतील अमर टेकपार्क इमारतीत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. कंत्राटी पद्धतीने त्या तेथे काम करत होत्या.

मंगळवारी दुपारी शहरात मुसळधार पाऊस झाला. काम आटोपल्यानंतर चंद्रकला बसथांब्याकडे निघाल्या होत्या. बालेवाडी भागातील पदपथाच्या बाजूला पाणी साचले होते. या परिसरात विद्युत वाहिनी उघड्यावर पडली होती. तेथून निघालेल्या चंद्रकला यांना विजेचा धक्का बसल्याने त्या कोसळल्या. बेशु्द्धावस्थेत चंद्रकला पडल्याची माहिती त्यांचा मुलगा संदीप यांना मिळाली.

त्यानंतर चंद्रकला यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. महावितरणच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांकडून महावितरणला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Protected Content