जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती देत नागरिकांना मृत इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5.10 वाजण्यापूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावरील नवीन दादऱ्याच्या खाली एक इसम आजारी अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याला औषधोपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती ऑन-ड्युटी स्टेशन मास्टर श्री. पालरेचा यांनी दिली.

मृत इसमाचे वय अंदाजे 28 वर्ष असून, अंगात आकाशी चौकटी रंगाचा मळकट शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पँट आहे. त्याचे केस काळे आणि वाढलेले असून, दाढी काळी व वाढलेली आहे. शरीर बांधा सडपातळ आणि रंग सावळा आहे. मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओळख पटविण्याकरिता ठेवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात सदर व्यक्ती कोणत्यातरी दीर्घ आजाराने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. या अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलीस जळगाव यांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन भावसार हे करीत आहेत.



