जळगाव प्रतिनिधी । आसोदा व ममुराबाद येथे सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन अर्थात लाल बावटा जिल्हा समितीच्या वतीने आज बुधवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील आसोदा व ममुराबाद या गावात सरकारी जागेवर आणि जिल्हा परिषदेच्या जागेवर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून निवासी प्रयोजनासाठी गरजू व गरीब कुटुंब राहत आहे. सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत अश्या गरजूंना ५०० चौरस मिटर जागा देण्यात यावी आणि घर बांधण्यासाठी दीड लाख रूपये देणे अपेक्षित आहे. परंतू गेल्या दोन वर्षांपासून अनेक वेळा मोर्चा आणि आंदोलने करण्यात आले व मागण्यांचे निवेदने देण्यात आली अद्यापपर्यंत कष्टकरींना न्याय मिळाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन अर्थात लाल बावटा जिल्हा समितीच्या वतीने आज बुधवार २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आणि विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद अढाळके, वंदना सपकाळे, रंजन कोळी, ताराबाई कोळी, उषा कोळी, शकुंतला खैरनार, छोटाबाई पाटील, वैशाली कोळी, कुसूम सपकाळे, लताबाई कोळी, सुरेखा कोळी, रंजना कोळी, विजया कोळी, आशाबाई कोळी, शशिकला कोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.