जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शांतता मानल्या जाणाऱ्या मेहरुण तलाव परिसरात एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर काहीही कारण नसतांना चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विजय सुकलाल जोशी (वय ६५, रा. शिवबानगर, कोल्हे हिल्स), जे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत, ते शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास मेहरुण पुलाजवळून जात होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी आरोपी अनंत प्रमोद गोंडे आणि अनिल शंकर लागवणकर (दोघे रा. जोशी कॉलनी) हे काहीही कारण नसताना मोठ्याने शिवीगाळ करत होते. एक जबाबदार नागरिक आणि माजी पोलीस या नात्याने जोशी यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला.

जोशी यांनी समज दिल्याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपी अनंत गोंडे याने आपल्याजवळील चाकूने विजय जोशी यांच्या पोटावर डाव्या आणि उजव्या बाजूला गंभीर वार केले. एवढ्यावरच न थांबता दोन्ही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. या हल्ल्यात जोशी हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठज्ञण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



