जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील मौजे पिंप्री हाट येथे एका मागासवर्गीय महिलेवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित महिलेचा विनयभंगही करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना शुक्रवारी (दि. १३ मार्च २०२६) देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, भडगाव तालुक्यातील मौजे पिंप्री हाट येथील सौ. लताबाई मांगो पगारे या मागासवर्गीय महिलेच्या घरात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घुसून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिलेचा विनयभंगही करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच पीडित महिलेला संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना सविस्तर निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आयु. हरिश्चंद्र सोनवणे, जिल्हा युवा अध्यक्ष आयु. जितेंद्र केदार, सचिव प्रा. प्रितीलाल पवार, संघटक प्रवीण सपकाळे, शैलेश सोनवणे, तक्रारदार मांगो पुंडलिक पगारे, राज पगारे, ॲड. सिद्धार्थ पगारे आदी उपस्थित होते. त्यांनी पीडित महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.



