Home क्राईम दिवाळीच्या तोंडावर काळाचा घाला! मालधक्क्यावर काम करताना तरूणाचा अचानक मृत्यू !

दिवाळीच्या तोंडावर काळाचा घाला! मालधक्क्यावर काम करताना तरूणाचा अचानक मृत्यू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भोईटे नगर परिसरातील रेल्वेच्या मालधक्क्यावर हमालीचे काम करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाला बुधवारी भर दिवसा कामावर असताना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घरातील कर्त्या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालयात झालेला त्यांचा मन हेलावणारा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

निलेश सुभाष गायकवाड (वय २८, रा. चिंचपूरा चौक, शिरसोली, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. निलेश हा शिरसोली येथे आई-वडील आणि लहान भावासह राहायचा. त्याचे संपूर्ण कुटुंब मजुरी काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी निलेश जळगावातील रेल्वेच्या मालधक्क्यावर हमालीचे काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (२२ ऑक्टोबर) निलेश नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मालधक्क्यावर काम सुरू असताना अचानक त्याला छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि काही क्षणातच त्याची प्रकृती गंभीर झाली. निलेशची अवस्था पाहून त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) उपचारासाठी दाखल केले.

परंतु, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर निलेशला मृत घोषित केले. डॉक्टरांनी निलेशला मृत घोषित केल्याचे समजताच, रुग्णालयात उपस्थित असलेल्या कुटुंबियांनी मोठा धक्का बसला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. कुटुंबाचा आधारस्तंभ अचानक सोडून गेल्याने शिरसोली गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळीच्या सणावर विरजण पडले असून, हमाली करणाऱ्या एका गरीब तरुणाचा हृदयविकाराने झालेला अकाली मृत्यू सर्वांना हळहळ लावणारा ठरला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.


Protected Content

Play sound