Home क्राईम चिनावलमध्ये धाडसी घरफोडी : सेवानिवृत्त शिक्षकांच्या घरातून सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

चिनावलमध्ये धाडसी घरफोडी : सेवानिवृत्त शिक्षकांच्या घरातून सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

0
192

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चिनावल येथे सेवानिवृत्त शिक्षकांच्या बंद घरावर झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तुकाराम वाडी भागातील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र मुरलीधर सरोदे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ₹2,12,266 किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना 14 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. हिवाळ्यातील शांत वातावरणाचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा धाडसी घरफोडीचा प्रकार घडवून आणला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

राजेंद्र सरोदे हे भावाच्या निधनानंतर मूळ गावी खडका येथे गेले होते. मृत्यूनंतरच्या विधीसाठी ते काही दिवस बाहेर होते. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते चिनावलला परतले असता घराचा लोखंडी दरवाजा अर्धवट उघडा आणि मुख्य दरवाज्याचा कडीकोंडा तुटलेला आढळला. ही स्थिती पाहताच त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले आणि चोरीचा प्रकार स्पष्ट झाला.

सरोदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांनी 2009 साली विकत घेतलेले राणीहार, तीन अंगठ्या, सोन्याचा तुकडा तसेच दोन बांगड्या असा एकूण ₹2,12,266 किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या ऐवजामध्ये 40 ग्रॅमचा राणीहार, दोन बांगड्या, विविध वजनाच्या अंगठ्या आणि सोन्याचा तुकडा यांचा समावेश आहे. याशिवाय समोरील हेमराज सखाराम सरोदे यांच्या बंद घराचेही कुलूप चोरट्यांनी फोडले. मात्र हे कुटुंब डोंबिवली येथे रहात असल्यामुळे घरात काहीही ऐवज नसल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.

हिवाळ्यात रात्री रस्त्यांवर कमी हालचाल होत असल्याने चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सरोदे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 454, 457 आणि 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल सानप आणि हवालदार विनोद तडवी करत आहेत.


Protected Content

Play sound