यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल ते भुसावळ मार्गावरील अंजाळे गावा जवळील मोर नदी वरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरील धोकेदायक वळण अपघातस्थळ बनले असल्याने येथे गतीरोधक बसवावे अशी मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.
यावल ते भुसावळ हा जवळपास १८ किलोमिटरचा प्रवाशी मार्ग असुन, सदरच्या मार्गावरील रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासुन राजोरा फाटा ते अंजाळे गावा पर्यताच्या रस्त्यावर मोठमोठी खड्डे निर्माण होवुन रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. दरम्यान अंजाळे गावाजवळच्या जुन्या अंजाळे घाटा वरील मोर नदीवर नवीन पूल उभारण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांची नक्कीच सुविधा झालेली आहे. तथापि, या पुलावरील एक धोकेदायक वळण हे अतिशय घातक ठरत असल्याचे दिसून आले आहे.
मागील दोन वर्षापुर्वी नवीन पुलाची बांधणी करीत नव्याने पुलासह वळणाचा रस्ता तयार करण्यात आला असुन ,नव्याने तयार झालेल्या या रस्त्यावर धोकादायक वळणासह मोठा उतार असल्याने या ठिकाणी भुसावळ कडुन येणारी वाहने हे अतिवेगाने येतात. या वेगाने येथे अनेक लहानमोठे अपघात येत आहेत. तर भविष्यात येथे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या रस्त्यावर तात्काळ वाहनांचे वेग नियंणत्रीत करण्यासाठी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी किमान तीन-चार ठिकाणी गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांसह नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.