Home Cities भुसावळ वरणगाव नागेश्वर रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात सापांचा धोकाः भाविक, विद्यार्थी भयभीत

वरणगाव नागेश्वर रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात सापांचा धोकाः भाविक, विद्यार्थी भयभीत


वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहराजवळील प्राचीन नागेश्वर महादेव मंदिर हे श्रद्धाळू भाविकांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. मात्र, या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गातील रेल्वे पुलाखाली साचणाऱ्या पाण्यामुळे भाविक आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरूच आहेत. विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचते आणि त्या पाण्यात साप दिसण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सुसरी, पिंपळगाव, गोळेगाव, बोदवड आदी भागांतून दररोज नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि शाळा-कॉलेजसाठी येणारे विद्यार्थी पुलाखालून जात असताना साचलेल्या पाण्यामुळे अडथळ्यांना सामोरे जात आहेत. या पाण्यात मोठमोठे खड्डे असून, त्यातून वाहनचालकांची आणि पादचाऱ्यांची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू आहे. काही घटनांमध्ये सर्पदंशही झाल्याचे समोर आले असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असतानाही, विभाग वारंवार जबाबदारी झटकत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. रेल्वे पूल जरी रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असला तरी, त्याखालील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून, त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याचे कर्तव्य विभागाचेच आहे. मात्र, प्रशासन ‘ही आमची जबाबदारी नाही’ असे म्हणत नागरिकांच्या त्रासाला डावलत आहे.

मागील वर्षी याच समस्येविरोधात विद्यार्थ्यांनी पाण्यात बसून आंदोलन केले होते. तरीही विभाग झोपेचे सोंग घेत असून, आजवर काहीही ठोस उपाययोजना झालेली नाही. यावर्षीही तीच स्थिती कायम आहे. आज सकाळी नगराध्यक्ष मा. सुनील काळे, ह.भ.प. विलास सेठ, भय्या सोनवणे यांच्यासह विविध गावांतील भाविक व विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्याकडे या त्रासाबाबत तक्रार केली.

या पुलाखाली साचलेल्या पाण्यात साप असल्याच्या घटनांमुळे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. परिणामी अनेक भाविक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून मंदिरात जातात, जे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे सर्पदंश आणि जीवितहानी होण्याची भीती लक्षात घेता, हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिक करत आहेत.


Protected Content

Play sound