जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळून दुचाकीने जात असलेले दिलीप पाटील व त्यांच्या पत्नी नेहा यांना २२ ऑगस्ट रोजी चार भामट्यांनी अडवून मारहाण करीत सोनसाखळी लुटली होती. दरम्यान, या चारपैकी एकाचा मृतदेह त्याच परिसरात आढळला होता. या प्रकरणातील तिघांपैकी दोघांना अटक शनिवारी अटक केली होती, सोनसाखळी घेवून फरार असलेला तिसरा आरोपीला. एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
शिरसोली येथील चौघांनी पाटील यांना मारहाण करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी लुटली असल्याचे समोर आले आहे. बळीराम आखाडू भील (वय २३, रा. शिरसोली) याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दीपक भगवान पवार (वय-२०), करण अशोक सोनावणे (वय २१, दोघे रा. शिरसोली) यांना अटक केली होती. तर किशोर प्रल्हाद भील हा बेपत्ता होता.
अशी होती घटना
नेहा पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी किशोरकडे असल्याची माहिती करण याने दिली आहे. करण याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार घटनेच्या दिवशी तो सकाळी १० वाजता दीपकसह दापोरा येथे सासरवाडीला गेला होता. त्यानंतर १०.३० वाजता बळीराम याने फोन करून दोघांना नेव्हारे शिवारातील डोंगरावर बोलावले होते. यानंतर बळीराम, दीपक, किशोर व करण या चौघांत दुपारपर्यंत अनेकवेळा फोनवर बोलणे झाले. दीपक व करण हे दोघेजण दुपारी १ वाजता पायी चालत डोंगरावर पोहोचले. थोड्या वेळाने किशोर हा रस्त्याकडे आला. त्यावेळी पाटील दांपत्य दुचाकी उभी करून जंगलात पायी चालत आले होते. किशोर याने दिलीप पाटील यांना मारहाण करून नेहा यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली. त्यानंतर चौघेजण पळून जात असताना दिलीप पाटील यांनी त्यांचा पाठलाग केला. ते एका खड्ड्यात पडल्यानंतर चौघांनी त्यांना बेदम मारहाण केली. याच दरम्यान, नेहा पाटील यांनी आरडाओरड केल्यानंतर काही वाहनचालक त्यांच्या दिशेने येत होते. हे पाहून किशोर व बळीराम हे रस्त्याच्या एका बाजूला तर दीपक व करण हे दुसऱ्या बाजूला पळून गेले. या घटनेनंतर जखमी पाटील यांना लोकांनी रुग्णालयात नेले. तर काही मिनिटांनंतर घटनास्थळापासून काही अंतरावर बळीरामचा मृतदेह मिळून आला होता. दरम्यान, दीपक व करण हे दोघे त्या रात्री दापोरा येथे पळून गेले. यानंतर दुसऱ्या दिवशी वावडदा, नेरी, जामनेर अशा विविध ठिकाणी जाऊन इच्छापूर मार्गे बऱ्हाणपूर येथे पळून जाणार होते. तत्पूर्वी या दोघांची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी विजय पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने इच्छापूर येथे जाऊन करण व दीपक या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, मृत बळीराम हादेखील पाटील दांपत्यास लुटण्याच्या घटनेत सहभागी असल्याचा उलगडा यातून झाला आहे.