जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने कठोर पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘दामिनी पथक’ (Damini Squad) स्थापन करण्यात आले असून, या पथकाने पहिल्याच दिवशी ९ टवाळखोरांवर कारवाई करत २५ जणांना समज देऊन सोडले. पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे पालक आणि विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हे ‘दामिनी पथक’ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन पुरुष व एक महिला अंमलदारांचा समावेश असलेल्या या पथकात एकूण १२ पुरुष आणि ६ महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे पथक आपल्या हद्दीतील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात, विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेस, गस्त घालत आहे. याठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर आणि विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
बुधवारी, या ‘दामिनी पथकाने’ मेहरुण तलाव परिसरातील सेंट टेरेसा स्कूल, नूतन मराठा महाविद्यालय, एम.जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, का.ऊ. कोल्हे विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले. विनाकारण शाळेच्या बाहेर थांबून विद्यार्थिनींना बघून अश्लील चाळे करणाऱ्या ९ टवाळखोरांवर पथकाने कारवाई केली. तर, इतर २५ जणांना कडक समज देऊन सोडून देण्यात आले. या कारवाईमुळे शाळा-महाविद्यालय परिसरातील सुरक्षितता अधिक वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.



