भुसावळ, प्रतिनिधी | शहरात अमृत योजनेमुळे जागोजागी केलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत राष्ट्रीय दलित पँथरने आज (४ जुलै) सकाळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन अमृत योजनेच्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लवकर दूर न केल्यास चिखलफेक आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर उद्यापासूनच कामास सुरुवात करण्याची ग्वाही मुख्याधिकारी यांनी त्यांना यावेळी दिली.यावेळी पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात थोडा वादही झाला.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात अमृत योजनेच्या कामाकरिता पाईप लाईन टाकण्यात येत आहे. यासाठी जागोजागी मोठमोठे खड्डे झाल्यामुळे पावसाचे पाणी त्यात साचले आहे., सर्वत्र चिखल झाला असून रस्त्ये निसरडे झाले आहेत, यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना, नागरिकांना, वृद्धांना, व महिलांना तसेच वाहन धारकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. रस्त्याने वावरणाऱ्या लोकांना ही डबकी वा खड्डा पटकन दिसून येत नाही, यामुळे अनेक अपघात यापूर्वी सुद्धा झाले आहेत. या पावसाळ्यात अपघात जास्त होण्याची शक्यता असल्याने एखाद्याचा यात काही बरेवाईट झाल्यास यास पालिका जबाबदार राहील.
शहरातील आंबेडकर नगर, आंबेडकर मार्ग, गौतम हॉल, तापीनगर, वसंत टॉकीज परिसर, काशीनाथ लॉज, यावल रोड आदी ठिकाणचे हे खड्डे येत्या आठ दिवसात पालिकेने त्वरित बुजवावे अन्यथा पँथर संघटनेतर्फे तीव्र स्वरूपाचे “चिखल फेक ” आंदोलन संघटनेच्या छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे राज्य प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष विजय साळवे, शहर प्रमुख राजू तायडे, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, तालुका प्रमुख मयूर सुरवाडे , बंटी रंधे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास पारधे , कार्याध्यक्ष बाळू मगर, आदींच्या सह्या आहेत. दरम्यान मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी उद्या पासूनच कामास सुरुवात करून नागरिकांच्या समस्या दुर करणार असल्याचे आश्वासन त्यांना यावेळी दिले.