जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील सी-सेक्टर मधील डाळ व्यापाऱ्याची तब्बल ३६ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ‘सक्षम उद्योग’चे मालक विनोदकुमार चंचलचंद जैन यांची, दलाल आणि तीन व्यापाऱ्यांनी संगनमताने मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी बुधवारी १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
गेल्या २० वर्षांपासून डाळ प्रक्रिया उद्योगात असलेले विनोदकुमार जैन यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, बालाजी ट्रेडिंगचा दलाल सूर्यकांत उर्फ राज संजय व्यास याने त्यांचा विश्वास संपादन केला. व्यासने जैन यांना किशोर ट्रेडर्स, आयुष ट्रेडर्स आणि विष्णुकांत पुरोहित ट्रेडर्स यांना मोठ्या प्रमाणात डाळ हवी असल्याचे सांगितले. दलालाच्या सांगण्यावरून जैन यांनी २८ जानेवारी २०२४ रोजी आयुष ट्रेडर्सला ४ लाख ३८ हजार ६० रुपयांची मूग डाळ पाठवली. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी पुन्हा ६ लाख ८० हजार रुपयांचा माल पाठवला. सुरुवातीला आरोपींनी १० ते १२ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र, दीपक व्यासने दिलेला चेक बाउंस झाल्याने फसवणुकीचा संशय बळावला.

जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३६ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा माल देऊनही त्यांना आरोपींकडून कोणताही मोबदला मिळाला नाही. जेव्हा त्यांनी आपल्या पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी त्यांना “पैसे मिळणार नाहीत, जे होईल ते करून घे,” अशी धमकी दिली. यानंतर, जैन यांनी १० सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी किशोर मिठालाल पुरोहित याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.



