जळगाव प्रतिनिधी – एखादा अधिकारी हा आपल्या छंदाला लोक चळवळीत कसे परिवर्तीत करू शकतो याचे उत्तर उदाहरण जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दाखवून दिले असून त्यांच्यामुळे जळगावात सायकलींगला मोठा प्रतिसाद मिळत आहेत. आपण स्वत: फिट राहण्यासाठी नित्यनेमाने सायकल चालवत असतो. निरोगी समाज निर्मितीसाठी आवश्यक असणार्या सायकलपटूंसाठी आपण सर्वतोपरी मदत करण्यास कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आज जळगाव सायकलीस्ट ग्रुपतर्फे चमकदार कामगिरी करणार्या सायकलपटूंच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव शहरासह जिल्ह्यात सायकलींगच्या चळवळीला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. याच माध्यमातून अनेक सायकलस्वार विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नवनवीन शिखरांना गवसणी घालत आहेत. याच प्रकारे विविध स्पर्धांमधून उत्तम कामगिरी करणार्या १९ सायकलपटूंचा सत्कार आज अल्पबचत भवनातील कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपवन संरक्षक विवेक होशींग, नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, शंकर गाढवे-पुणे आणि श्रीमती प्रिती म्हस्के यांची उपस्थिती होती.
यांचा झाला सत्कार !
याप्रसंगी अमरावती येथील निशांत गुप्ता; जळगाव येथील सुनील चौधरी, स्वप्नील मराठे, संभाजी पाटील, विजय घोलप, अमोल कुमावत, विनोद पाटील, कामिनी धांडे, अतुल सोनवणे, दीपक दलाल यांचा; भुसावळ येथील गणसिंग पाटील, विजय फिरके, भाऊसाहेब पाटील, मनोज चौधरी तसेच चाळीसगाव येथील टोनी पंजाबी, अरूण महाजन आणि रवींद्र महाजन या सायकलस्वारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, या आधी सुध्दा सायकलस्वारांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले होते. त्या कार्यक्रमात नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी पुढील कार्यक्रमात जळगावातील सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा आशावाद व्यक्त केला होता. आजच्या कार्यक्रमातून हे दिसून आले आहे. पाटील यांनी आपल्या छंदाला इतर समविचारी सहकार्यांच्या मदतीने प्रत्यक्षात साकार केले आहे. जळगावात सायकलस्वारांना चांगले रस्ते मिळावेत यासाठी आपले प्रयत्न असून येत्या काही महिन्यांमध्ये हे चित्र बदललेले असेल अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रतापराव पाटील यांनी सायकलींगचा प्रकार स्थानिक पातळीवर अजून रूजण्यासाठी आपण सर्व सहकार्यांसह प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रा.हर्षल पाटील यांनी केले.