जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हयात खरीप हंगामात कापूस हे नगदी पिक घेतले जाते. जिल्हयात लागवडीलायक क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. परंतु मागील काही वर्षांचा अनूभव लक्षात घेता कापूस पिकात किडींचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उत्पादन खर्चात ३० टक्के वाढ झालेली असल्याने अपेक्षित उत्पादन येवून देखील उत्पादन खर्च जास्त झाल्याने शेतक-याच्या नफ्यात घट झालेली दिसुन येते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कापूस पिकात आंतरपिक म्हणून तुर, मुग व उडीद या पिकांचा समावेश करावा.
जेणे करुन जमिनीतील सुपिकता निर्देशांकात वाढ व एकात्मिक किड व्यवस्थापन (गुलाबी बोंड अळी) या सारख्या किंडींचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होते. तसेच कापूस पिकात आंतरपिक म्हणून कडधान्याचा समावेश केल्याने जमिनीची धूप कमी होणे, उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते त्यामुळे आंतर पीक घेण्याचे आवाहन केले आहे. जळगाव जिल्हाची दाळ मिल नगरी म्हणून ओळख असल्याने जळगाव शहरात ९४ दाळ मिल कार्यान्वित असल्याने दाळ प्रक्रीया उद्योग वाढीसाठी वाव आहे. त्याचबरोबर विविध शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपनी यांना हमी भाव मिळण्यास देखील हातभार लागणार आहे. शेतकरी बांधवांच्या हितार्थ जिल्हयात कृषि विभागानार्फत राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियन अंतर्गत तुर, मुग व उडीद पिकाचे प्रात्यक्षिक व बियाणे तालुकास्तरावर अनुदान तत्वावर कडधान्य पिकांचे बियाणे मिळणार असुन जास्तीतजास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.