बारामती (वृत्तसंस्था) दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांच्या शोकसभेची परवानगी मागावयास गेलेल्या जवानास पोलिसांनी बेड्या घालून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार बारामतीत घडला आहे. सीआरपीएफ जवान अशोक इंगवले असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे वर्दीत होते. तरीही बारामती पोलिसांनी त्यांना मारहाण केली.
अशोक इंगवले हा सोनगाव येथील राहणारा आहे. आज सकाळी श्रद्धांजली सभेसाठी परवानगी मागण्यासाठी तो तालुक्याच्या पोलीस ठाण्यात गेला होता. त्यावेळी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचा व दारू प्यायल्याचा आरोप करून पोलिसांनी त्याला तब्बल सात तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. दारू प्यायल्याचा आरोप जवानाने फेटाळला. ‘माझी वैद्यकीय तपासणी करा. त्यातून सत्य समोर येईल’, असं त्यानं पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांनी त्याचं ऐकून घेतलं नाही. उलट १६ पोलिसांनी मिळून त्याला मारहाण केली. विशेष म्हणजे, इंगवले यांच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली.10 ते 15 पोलिसांनी बंद खोलीत डांबून मारहाण केली. तसेच, वर्दीवर असताना बेड्या ठोकल्या, असा आरोप सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांनी केला आहे.