जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या मंगळवारी ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’चा दुग्धशर्करा योग आल्याने मंगळवारी ६ जानेवारी रोजी जळगाव शहर आणि परिसरात भक्तीचे वातावरण ओसंडून वाहत आहे. वर्षातील पहिलीच चतुर्थी आणि त्यातही अंगारकी योग असल्याने आज पहाटे ५ वाजेपासून जिल्ह्यातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे.

इच्छापूर्ती मंदिरात भक्तीचा जागर :
जळगाव शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात आज पहाटेपासूनच विशेष धार्मिक विधींना सुरुवात झाली. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी पिण्याचे पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

तरसोदच्या जागृत देवस्थानला भाविकांची पसंती :
जळगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या तरसोद येथील श्री गणपती मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली. जळगाव शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी पायी चालत जात तरसोदच्या बाप्पाचे दर्शन घेतले. अंगारकी निमित्त मंदिरात अभिषेक, महापूजा आणि विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
२०२६ मध्ये दोन अंगारक योग :
हिंदू धर्मशास्त्रात अंगारक संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी’ म्हटले जाते. विशेष म्हणजे, २०२६ या वर्षात जानेवारी आणि मे अशा दोन महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग येत आहे. या विशेष योगाचे स्वागत करण्यासाठी गणेश मंदिरांमध्ये दिवसभर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो, असे साकडे घालण्यासाठी आज जळगावकरांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होणे पसंत केले.



