रस्त्यावरील वयोवृध्दांना लुटणाऱ्या गुन्हेगारास वराडसीम येथून अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यात इतर ठिकाणी वयोवृद्धांना गोड बोलून दुचाकीवर बसवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख लांबविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी गुरूवार १० मार्च रोजी रात्री अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरात आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींना गाठून त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाडीवर बसून त्यांच्याकडील पैसे व सोन्याचे दागिने जबरी हिसकावण्याच्या घटना घडल्या आहे. या घटनांबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात -२, फैजपूर पोलीस ठाण्यात १ आणि शनीपेठ पोलीस ठाण्यात १ असे एकुण ४ वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या चारही गुन्ह्याची उकल करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना सुचना दिल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस नाईक विकास सातदिवे, सुधीर साळवे, हेमंत कळसकर या तीन जणांचे विशेष पथक तयार करून त्यांना गुन्ह्याच छडा लावण्याच्या सुचना दिल्यात.  विशेष पथकाने सीसीटीव्हीचे फुटेज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकीच्या माहितीच्या आधारे काम करण्यास सुरुवात केली असता त्यांना संशयित आरोपी इब्राहीम उर्फ टिपू सत्ता मन्यार (वय-३०) रा. बाहेरपूरा, वराडसिम ता. भुसावळ जि.जळगाव याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने गुरुवार १० मार्च रोजी रात्री ११.३० वाजता संशयित आरोपी इब्राहीम उर्फ टिपू सत्तार मन्यार याला वराडसिम गावातून अटक केली. त्याने चारही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीकडून जिल्ह्यातील इतर गुन्हे देखील उघडकीला येण्याची दाट शक्‍यता आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या सुचनेनुसार व पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ मिलिंद सोनवणे, पो.ना. गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, इम्रान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, मुबारक देशमुख यांनी कारवाई केली.

Protected Content