Home क्राईम बसस्थानक परिसरातून मोबाईल लांबविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

बसस्थानक परिसरातून मोबाईल लांबविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

0
134

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. हमीद आयुब खान (वय २२, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचे तीन महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

मंगळवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास नवीन बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. यावेळी बसमध्ये चढण्याच्या गडबडीत असताना निखिल राजू मानके (रा. धानवड), मयूर मांगू पाटील (रा. चिंचखेडा) आणि अन्य एका विद्यार्थिनीच्या खिशातील मोबाईल चोरट्याने अत्यंत चाणाक्षपणे लंपास केले. आपले फोन चोरीला गेल्याचे लक्षात येताच या विद्यार्थ्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. एकाच वेळी तीन मोबाईल चोरीला गेल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी भारती देशमुख, राहुल पाटील आणि नरेंद्र दिवेकर यांचा समावेश होता. तांत्रिक तपासाच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनीतील हमीद खान संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तीनही मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हमीद हा पोलिसांच्या दप्तरी असलेला ‘रेकॉर्डवरील’ गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.


Protected Content

Play sound