जळगाव प्रतिनिधी । मंदिरातून दर्शन घेवून घरी जात असलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची मंगलपोत लांबवून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत महिलेने मंगळवारी सकाळी रामानंद नगर पोलीसात येवून तक्रार दाखल केली आहे.
याबाबत महिलेने दिलेली माहिती अशी की, शहरातील पार्वती नगरातील रजनी अपार्टमेंटमध्ये राहणार्या वंदना किरण खानवले वय ५७ ह्या सोमवारी सायंकाळी महादेव मंदिरातून दर्शन घेवून घरी जात होत्या. याचवेळी महाबळ रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या समोरील गल्लीतून वंदना खानवले ह्या पायी जात असतांना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी मावशी, हा पत्ता कुठला आहे, असे विचारून त्यांच्याजवळ मोटारसायकल थांबविली. याचवेळी मोटारसायकलच्या मागील बाजुला बसलेल्या भामट्याने महिलेच्या गळ्यातील १३ हजार रुपयांची मंगलपोत ओढळून नेली.
महिलेने आरडाओरड केली, तो पर्यंत मोटारसायकलवर आलेले दोन्ही भामटे पळून जाण्यास यशस्वी झाले होते. दरम्यान मंगळवारी सायंकाळी वंदना खानवले यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल दिली. त्यांच्या तक्रारीची दखल घेवून रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती. दरम्यान शहरात पुन्हा सोनसाखळी चोरीच्या घटना घडू लागल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.