जळगाव (प्रतिनिधी) नाथवाडा, जखनी नगर कंजरवाडा शेजारी राहणाऱ्या शोभाबाई पंडीत बाविस्कर ह्या त्यांची ४ मुले व मुलीसोबत त्यांच्या घरात असतांना सकाळी ८ वाजेच्या सुमारास कंजर वाडा येथील ६ ते ७ जणांनी आमची दारू का पकडून दिली म्हणत शोभाबाई व त्यांच्या मुला, मुलीस घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच बलत्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मारहाण करणाऱ्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभाबाई बाविस्करने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार , शोभाबाई यांच्या घरासमोर श्याम मनोहर गारुंगे, त्याच्या सोबत त्याची पत्नी अनिता गारुगे, गंगा गारुंगे, पुजा बागडे, निलम बाटुंगे व इतर दोन असे गर्दी करुन आले. यावेळी श्याम गारंगे म्हणाला की, तुम्ही लोकांनी पोलीसांना आमची दारु पकडुन का दिली असे म्हणत घरात घुसुन शोभाबाई तसेच मुलगी निशाबाई पाटील, मुलगा शिवाजी बाविस्कर ,मुकेश बाविस्कर अशांना सगळ्यानी मारहाण करत शिवीगाळ करू लागले. यावेळी त्यांनी घरातील वस्तू फेकुन दिल्यात. तसेच आम्ही तुमच्या विरुध्द पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करु, तुमचे जीवन उध्वस्त करुन टाकु. तुम्हाला नाथवाड्यात राहू देणार नाही अशा धमक्या देत शिवीगाळ केली. श्याम मनोहर गारंगे याने पोलीसांनी त्याची ४० हजारांची पकडलेली दारू भरून देण्याची मागणी यावेळी केली. याप्रकाराने घाबरून शोभाबाई तिच्या मुलांसह अयोध्या नगर येथे राहणाऱ्या तिच्या भावाकडे निघून गेली.