जळगाव प्रतिनिधी । नातेवाईक शेजारी ओट्यावर बसल्याच्या कारणावरून विवाहितेला तीन महिलांनी शिवीगाळ करून काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रामेश्वर कॉलनीतील ममता हॉस्पिटलजवळ सोमवारी दुपारी घडली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता किरण सपकाळे (वय-२२) रा. गणेशपुरी ममता हॉस्पिटल, रामेश्वर कॉलनी. यांच्याकडे १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईक आले होते. त्यावेळी नातेवाईक हे शेजारी राहणारे शोभाबाई सपकाळे यांच्या घराच्या ओट्यावर बसले होते. याचा राग शोभाबाई सपकाळे यांना आला. त्यावरून शोभा सपकाळे यांनी अनिता सपकाळे यांना शिवीगाळ करून शोभाबाई यांची मुलगी व नात यांच्या मदतीने डोक्यात काठी मारली. यात अनिता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.