जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे कॅबिनेट मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांना नितेश राणे यांनी पत्रकारांसमोर जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली असून त्यांच्या सुरक्षेकरिता निलेश राणे व नितेश राणे यांना अटक करावी या मागणीचे निवेदन युवासेनेने उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव कुमार चिंथा यांना दिले आहे.
या निवेदनात, “निलेश राणे व नितेश राणे हे कुख्यात गुन्हेगार असून नितेश राणे हे नुकतेच जीवे मारण्याच्या खटल्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून जामीनवर बाहेर आहेत. ह्या आधी देखील ह्या दोघांवर खून, खुनाचा कट रचणे, धमकावणे अशा अनेक तक्रारी व FIR आहेत.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई या आमच्या नेत्यांच्या गाडीवर हल्ला करून जीवे मारण्याची जाहीर धमकी नितेश राणे यांनी पत्रकारांसमोर दिली असून निलेश राणे याने आमचे नेते वरुण सरदेसाई यांना मारणार असे जाहीररित्या पत्रकारांसमोर म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर नोंद घ्यावी व आमच्या नेत्यांच्या सुरक्षेकरिता निलेश राणे व नितेश राणे यांना लगेच अटक करावी.” असा उल्लेख असून अटकेची मागणी पोलीस खात्याला युवासेनेने केली आहे.
युवासेनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव कुमार चिंथा यांना या विषयाचे निवेदन देण्यात आले. या वेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, भूषण सोनवणे, प्रीतम शिंदे आदी युवासैनिक उपस्थित होते.