Home क्राईम दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात धडक मोहीम : ५०० ठिकाणी छापे, ६०० जण ताब्यात

दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात धडक मोहीम : ५०० ठिकाणी छापे, ६०० जण ताब्यात

0
146

श्रीनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्ब स्फोटानंतर देशातील तपास यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून, या प्रकरणाचे धागे थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचले आहेत. प्राप्त माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी मोहीम राबवत तब्बल ५०० ठिकाणी धाड टाकली आहे आणि सुमारे ६०० संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही व्यापक कारवाई बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली असून, या संघटनेने पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न सुरू केल्याची गंभीर माहिती तपास यंत्रणांकडून समोर आली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, श्रीनगर, पुलवामा, कुलगाम, शोपियां, बारामुला यांसारख्या दहशतवादग्रस्त जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी एकाच वेळी पार पडली. काही ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, दस्तऐवज, बॅनर आणि बंदी घातलेल्या संघटनांचे प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान जमात-ए-इस्लामीशी संबंधित अनेक व्यक्ती परदेशी संपर्कात असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

दरम्यान, दहशतवादी ‘व्हाईट कॉलर टेरर’ मॉड्यूलविरोधातही निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. या मॉड्यूलशी संबंधित तीन सरकारी कर्मचारी आणि सात इतर व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यांमधून देखील काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून, त्यानंतरच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित गेल्या वर्षभरात तुर्कीमध्ये गेले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी स्फोटके तयार करण्याचे आणि सायबर नेटवर्कद्वारे निधी उभारणीचे प्रशिक्षण घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. स्फोटकांचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर, एका डॉक्टरसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ‘व्हाईट कॉलर टेरर’ मॉड्यूलशी संबंधित २०० हून अधिक लोकांची चौकशी झाल्याचे अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात पोलिसांनी तब्बल ३० ठिकाणी छापेमारी केली असून, त्या ठिकाणांहून संगणक, मोबाईल, हार्ड ड्राईव्ह, मेमरी कार्ड तसेच बंदी घातलेल्या संघटनांचे पोस्टर्स जप्त करण्यात आले आहेत. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, जमात-ए-इस्लामी पुन्हा सक्रिय होण्यासाठी काश्मीरमधील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होती. प्राप्त माहितीनंतर राज्य प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.


Protected Content

Play sound