Home राजकीय सीपी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय

सीपी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय

0
194

नवी दिल्ली-वृत्तसेवा । भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रभावी विजय मिळवला आहे. या विजयासह ते भारताचे १७ वे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

निकालानुसार, सीपी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. एकूण ७६७ खासदारांनी मतदान केले, त्यापैकी १५ मते अवैध ठरली आणि ७५२ वैध मतांवर निकाल जाहीर झाला. इंडिया आघाडीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने विरोधी गटात क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झाले.

एनडीएकडे सुरुवातीला ४२७ खासदारांचे समर्थन होते. मात्र, वायएसआर काँग्रेसच्या ११ खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याने हा आकडा ४३८ वर पोहोचला. तरीही त्यांना एकूण ४५२ मते मिळाल्याने आणखी १४ विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला समर्थन दिले असल्याचे स्पष्ट झाले.

चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए शिक्षण पूर्ण केले. १९७३ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले आणि पुढे जनसंघात सक्रिय झाले.

ते दक्षिण भारतातील भाजपचे प्रमुख नेते असून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केरळचे प्रभारी म्हणून काम केले असून २००४, २०१२ आणि २०१९ मध्ये कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. तसेच महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल आणि काही काळ पुदुच्चेरीचे उपराज्यपाल म्हणूनही त्यांनी सेवा दिली आहे.


Protected Content

Play sound